मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या यंदाच्या १०वी, १२वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २८ ऑगस्ट, सोमवार दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी त्याबाबतचे परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. बोर्डाने यंदा दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान घेतली आहे तर बारावीची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट घेतली आहे. या परीक्षेच्या वेळेस अतिवृष्टीमुळे तीन वेळा बदलही करण्यात आले होते. त्यामुळे या परीक्षांच्या निकालाकडे पालक, विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष होते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येणार आहे त्यामुळे अनेकांचे या निकालाकडे लक्ष होते.
दरम्यान पुरवणी परीक्षेच्या निकालातही गुणपडताळणी आणि फोटो कॉपी घेता येते. सोमवारी निकाल लागल्यानंतर 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधी मध्ये त्यासाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. हा अर्ज ऑनलाईन करता येतो. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. त्यानंतर उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यापद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे पाठवावा लागेल.
दहावीच्या पुरवणी परीक्षेची १८ जुलै रोजी सुरुवात झाली होती. ती १ ऑगस्टपर्यंत चालणार होती. मात्र, याच दरम्यान राज्यभरात अतिवृष्टीमुळे दोन पेपर पुढे ढकलण्यात आले होते. त्यात २० आणि २९ जुलै रोजीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि त्या परीक्षा २ आणि ३ ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या होत्या. अशीच गत बारावीच्या २० जुलै रोजीच्या परीक्षेच्या संदर्भातील झाली होती. बारावीची सर्वसाधारण द्विलक्षी विषय असलेली परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत चालणार होती. मात्र, या परीक्षेचेही दोन पेपर पुढे ढकलण्यात आल्याने ही परीक्षा ११ ऑगस्टपर्यंत चालली. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षेचे निकाल लांबणीवर पडले होते. मात्र, मंडळाकडून आता याची तयारी पूर्ण करण्यात आल्याने सोमवारी दोन्ही पुरवणी परीक्षेचे निकाल जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.