BMC Election 2026: उद्धव ठाकरेंसमोरच बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी; महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात पेच, नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची लगबग सुरू असतानाच, 'मातोश्री'वर रात्रीच्या वेळी एक मोठे राजकीय नाट्य रंगल्याची माहिती समोर येत आहे.

BMC Election 2026: उद्धव ठाकरेंसमोरच बड्या नेत्यांमध्ये खडाजंगी; महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात पेच, नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची लगबग सुरू असतानाच, 'मातोश्री'वर रात्रीच्या वेळी एक मोठे राजकीय नाट्य रंगल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवारांना 'एबी' फॉर्म वाटप करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत शिवसेना (UBT) पक्षाचे दोन अत्यंत विश्वासू आणि वजनदार नेते समोरासमोर आल्याने खळबळ उडाली आहे. वांद्रे विभागातील एका वॉर्डाच्या उमेदवारीवरून आमदार अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यात तीव्र मतभेद झाल्याने परब तडक बैठक सोडून निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या वादाचे मुख्य केंद्र ठरला आहे वांद्रे येथील वॉर्ड क्रमांक 95. या वॉर्डातून हरी शास्त्री यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून ते दिवंगत शिवसेना नेते श्रीकांत सरमळकर यांचे जावई आहेत. सरमळकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. मात्र, अनिल परब यांचा या उमेदवारीला विरोध असल्याचे समजते, तर दुसरीकडे वरुण सरदेसाई यांनी शास्त्री यांच्या नावाचा आग्रह धरला होता. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

रात्री अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या बैठकीत जेव्हा हा उमेदवारीचा पेच सुटला नाही, तेव्हा अनिल परब नाराज होऊन मातोश्रीवरून बाहेर पडले. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सल्लागार आणि कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात, तर वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे जवळचे नातेवाईक असून वांद्रे पूर्वचे आमदार आहेत. पक्षाच्या बालेकिल्ल्यातच दोन दिग्गज नेत्यांमध्ये असा संघर्ष निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा: Mangesh Kalokhe Death Case : काळोखेंच्या हत्याकांडातील बीड कनेक्शन, संशयितांपैकी एक वाल्मिक कराडच्या गॅंगचा मेंबर असल्याची शक्यता

दुसरीकडे, यंदाची महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे एकत्र लढवत आहेत. मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी या दोन पक्षांनी युती केली असली, तरी अंतर्गत जागावाटपाचा तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. ज्या प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांनी दावा केला आहे किंवा जिथे स्थानिक पातळीवर तीव्र मतभेद आहेत, अशा जागांचे एबी फॉर्म अद्याप राखून ठेवण्यात आले आहेत. मात्र, मित्रपक्षांऐवजी स्वतःच्याच पक्षातील दोन नेत्यांमधील वाद आता पक्षासमोर मोठे आव्हान ठरत आहे.

एकीकडे महायुतीचे आव्हान समोर असताना, अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने 'मातोश्री'वर सध्या टेन्शनचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचे प्रयत्न केले खरे, पण अनिल परब यांचे अचानक निघून जाणे बरेच काही सांगून जात आहे. आता वॉर्ड क्रमांक 95 च्या उमेदवारीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागतो आणि हा अंतर्गत कलह निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मुंबईच्या सत्तेसाठी चाललेल्या या 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये आता प्रत्येक तासाला नवनवीन वळणे येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा काही वेळ उरला असताना, ठाकरे गटातील हे 'नाराजी नाट्य' शांत होते की नव्या वादाला तोंड फोडते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजप सज्ज, उमेदवारी जाहीर, युवा चेहऱ्यांना संधी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number