चीनमधील लोकप्रिय तंत्रज्ञान कंपनी शाओमीने 25 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या नवीन शाओमी 17 सीरिजचे अनावरण केले. या मालिकेत तीन मॉडेल्स समाविष्ट आहेत. शाओमी 17, 17 प्रो आणि 17 प्रो मॅक्स. अत्याधुनिक हार्डवेअर आणि आधुनिक डिझाइनमुळे या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व मॉडेल्समध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जन 5 चिपसेट असून ते अँड्रॉइड आधारित हायपरओएस 3 वर कार्यरत आहेत.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, शाओमी 17 चे दर चीनमध्ये Rs.56,000 ते Rs. 62,000 दरम्यान आहेत. शाओमी 17 प्रोची किंमत Rs. 62,300 पासून सुरू होऊन Rs. 74,700 पर्यंत जाते, तर शाओमी 17 प्रो मॅक्सची किंमत Rs. 74,700 ते Rs. 87,200 इतकी ठेवण्यात आली आहे. या किंमतीमुळे ही मालिका प्रीमियम श्रेणीतील स्मार्टफोन बाजारात थेट स्पर्धा करणार आहे.
नवीन मॉडेल्सच्या डिस्प्ले विभागात मोठी सुधारणा करण्यात आली आहे. 17 प्रो मॅक्समध्ये 6.9-इंचाचा 2K स्क्रीन, तर 17 प्रो आणि 17 मध्ये 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. सर्व स्क्रीन ड्रॅगन क्रिस्टल ग्लासने संरक्षित आहेत. विशेष म्हणजे, मागील बाजूस M10 सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यावर नोटिफिकेशन्स, एआय पोर्ट्रेट्स आणि सेल्फी प्रीव्यू पाहता येतो.
कॅमेऱ्याच्या दृष्टीनेही ही मालिका आकर्षक आहे. लाईका-ट्युन केलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मुख्य लेन्स, अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5x ऑप्टिकल झूमसह टेलिफोटो/पेरिस्कोप लेन्स देण्यात आली आहे. 50MP फ्रंट कॅमेऱ्यामुळे हाय-क्वालिटी व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी अनुभव मिळणार आहे. तसेच HDR10+, डॉल्बी व्हिजन आणि 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगचा सपोर्टही दिला आहे.
बॅटरी विभागातही शाओमीने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. 17 प्रो मॅक्समध्ये 7,500mAh बॅटरी, 17 प्रोमध्ये 6,300mAh बॅटरी आणि शाओमी 17 मध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. सर्व मॉडेल्स 100W वायर्ड व 50W वायरलेस चार्जिंगसह उपलब्ध आहेत. तसेच या मालिकेत 5G कनेक्टिव्हिटी, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, NFC, USB-C, UWB, IP68 वॉटर रेझिस्टन्स यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
एकूणच, शाओमी 17 सीरिज ही डिझाइन, कॅमेरा आणि बॅटरी तंत्रज्ञानाचा संगम ठरत असून, प्रीमियम स्मार्टफोन खरेदीदारांसाठी हा एक दमदार पर्याय ठरू शकतो. फ्लॅगशिप बाजारातील स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी शाओमीने या मालिकेत मोठी तयारी केली आहे.