Teachers Day 2026: 5 सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा होतो? डॉ. राधाकृष्णन यांच्याशी काय आहे खास नातं? जाणून घ्या रंजक कथा

5 सप्टेंबरला भारतात शिक्षक दिन का साजरा केला जातो? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, शिक्षक दिनाची सुरुवात, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाबद्दल जाणून घ्या.

Teachers Day 2026: 5 सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा होतो? डॉ. राधाकृष्णन यांच्याशी काय आहे खास नातं? जाणून घ्या रंजक कथा

Teachers Day: भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या आणि समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष दिवस आहे. यंदाही शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशभरातील 48 उत्कृष्ट शालेय शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान करणार आहेत.

5 सप्टेंबरलाच शिक्षक दिन का?

भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूतील तिरुत्तणी येथे झाला होता. त्यांनी आयुष्यभर शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले आणि अध्यापनाला समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

शिक्षकापासून राष्ट्रपतीपर्यंतचा प्रवास

डॉ. राधाकृष्णन यांचे बालपण साधेपणात गेले. त्यांनी शिष्यवृत्तीच्या मदतीने उच्च शिक्षण पूर्ण केले आणि तत्त्वज्ञान विषयात विशेष प्राविण्य मिळवले. 1909 मध्ये त्यांनी अध्यापन क्षेत्रात कारकीर्द सुरू केली आणि पुढे देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन व नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यानांसाठी निमंत्रित करण्यात आले. पुढे त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी युनेस्कोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, 1952 मध्ये उपराष्ट्रपती आणि 1962 ते 1967 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा केली.

शिक्षक दिनाची परंपरा कशी सुरू झाली?

1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस देशातील सर्व शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची सूचना केली. त्यानंतर 5 सप्टेंबर ही परंपरा कायम राहिली.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे महत्त्व

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून दरवर्षी उत्कृष्ट शिक्षकांची निवड पारदर्शक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केली जाते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव केला जातो. यंदाच्या कार्यक्रमात पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या कार्यावर आधारित लघुपटही सादर केले जाणार आहेत.

शिक्षकांचे योगदान का महत्त्वाचे?

शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीवही रुजवतात. एका चांगल्या शिक्षकाचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्यावर पडतो. त्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस केवळ एका महान व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारा नसून, देशाचे भविष्य घडवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला सलाम करण्याचा दिवस मानला जातो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number