हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणी वर्धा न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे ह्याला दोषी ठरवले आहे. याप्रकरणी गुरुवारी निकाल जाहीर होणार असून पीडीत शिक्षिकेच्या मृत्यूच्या दिवशी आरोपीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडित प्राध्यापक आशाताई कुणावार या महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाच्या अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. ३ फेब्रुवारी २०२० रोजी त्या हिंगणघाट येथे पोहचल्या. महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे त्यांची वाट पाहत होता. यावेळी पीडित प्राध्यापक दिसताक्षणी आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. घटनेनंतर पीडितेला लगेचच नागपूर ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आठवडाभर मृत्यूशी झुंज देत अखेर १० फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.
जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आतापर्यंत २९ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला असून उद्या आरोपाला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
या घटनेनंतर शक्ती कायदा लागू करून आरोपीला फाशी देण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचले. आणि राज्यात शक्ती कायदा लागू झाला. ३ फेब्रुवारी रोजी या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली. याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली असून आरोपी विकेश नगराळेला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तसेच पीडीत शिक्षिकेच्या मृत्यूच्या दिवशी आरोपी विकेश नगराळेला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.