राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक नेहमी भाजपच्या चुकीच्या कारवाईंविरोधात आवाज उठवतात. त्यामुळे त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ‘मलिकांच्या घरी पहाटे ईडीचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर त्यांना सकाळी सहाच्या सुमारास ईडी कार्यालयात नेण्यात आले. १९९२ सालच्या घटना आणि १९९९ सालच्या जागेचा करार आणि त्यानंतर बारा वर्षांनी पाएमएलएचा जन्म झाला. यामध्ये अनेक नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये नवाब मलिकांचे कुठेही नाव नव्हते. मग आत्ताच नवाब मलिकांवर कारवाई का केली जात आहे? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.’
नवाब मलिक भाजपच्या चुकीच्या कारावाईंविरोधात आवाज उठवतात. त्यामुळे त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच, ईडीने मलिकांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.