विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला मुख्यमंत्रीच अनुपस्थित राहिले आहेत. मुख्यमंत्री येणार असे त्यांच्या सचिवालयाकडून सकाळी सांगण्यात आले होते. मात्र, अचानक या चहापानाकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. परंतु चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नसल्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
त्यानंतर माविआच्या मंत्र्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात चहापान घेतले. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. सरकार निष्क्रिय आणि जनविरोधी असल्याचे कारण देत भाजपा नेते चहापानाला आले नाहीत. चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये येत्या अधिवेशनात २२ विधेयके सादर करणार असल्याचे ठरले. तसेच या अधिवेशनामध्ये अपेक्षित शक्ती कायदा मांडला जाणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.