गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. या मालमत्तेचे एकूण मूल्य ५ कोटी ७५ लाख इतके आहे. यामध्ये लोणावळ्यातील बंगला, जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे. ही मालमत्ता १० दिवसांत खाली करावी, असे ईडीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. खडसेंसह इतर चौघांनाही नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. २५ ऑगस्ट २०२१ रोजी एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, इन्सिया मुर्तझा बदलावाला आणि उकानी यांच्या वैयक्तिक तसेच संयुक्त मालकीच्या ११ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या होत्या.
या नोटिशीनुसार, नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत संबंधित मालमत्ता रिकाम्या करण्यात याव्यात, असे आदेश संबंधित मालमत्तांच्या मालकांना देण्यात आले आहेत. तसे न झाल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या करण्याचा अधिकार संचालनालयाकडे असेल, असे या नोटिशीत लिहिण्यात आले आहे. याशिवाय संबंधित मालमत्ता हस्तांतरण, विक्री, भाडेकरारावर देण्यास परवानगी दिली जाऊ नये, असेही या नोटीशीमार्फत नोंदणी महानिरीक्षक तसेच नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, सूरत येथील जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले आहे.