हैदराबाद: आयपीएल 2026 च्या रोमांचक लढतीत सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सवर 33 धावांनी विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. हैदराबादच्या घरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने 235 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची दमछाक झाली आणि त्यांना सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला. विशेष म्हणजे, सुरुवातीचे सातही सामने जिंकणाऱ्या पंजाबची लय आता पूर्णपणे बिघडल्याचे पाहायला मिळत आहे.
ईशान किशन आणि हेनरिक क्लासेनची वादळी अर्धशतके
सनरायझर्स हैदराबादला विशाल धावसंख्या उभारून देण्यात सलामीवीर ईशान किशन आणि मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासेन यांचा मोलाचा वाटा राहिला. दोघांनीही दमदार अर्धशतके झळकावत पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मात्र, या खेळीमध्ये पंजाबच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा हैदराबादला मोठा फायदा झाला. पंजाबच्या खेळाडूंनी दिलेल्या अनेक जीवदानांचा फायदा घेत हैदराबादने धावफलक हलता ठेवला आणि 235 धावांचे लक्ष्य सेट केले.
कूपर कोनोलीची एकाकी झुंज आणि शानदार शतक
236 धावांच्या अवाढव्य लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या 4 धावांवर त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. अशा कठीण परिस्थितीत कूपर कोनोली मैदानात उतरला आणि त्याने शेवटपर्यंत लढा दिला. कोनोलीने अवघ्या 59 चेंडूत 107 धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 8 गगनभेदी षटकार ठोकले. जरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नसला, तरी त्याच्या या शतकामुळे पंजाबचा नेट रनरेट कोसळण्यापासून वाचला.
Nitish Kumar Reddy ? Heinrich Klaasen ? Both @SunRisers' batters providing impetus in the 17th over ? Updates ▶️ https://t.co/8L0gAuxW78#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvPBKS | @SunRisers pic.twitter.com/XOopvXEU6b — IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026
पंजाबच्या फलंदाजांचे अपयश आणि कर्णधार फ्लॉप
कोनोलीने एका बाजूने किल्ला लढवला असला, तरी दुसऱ्या बाजूने त्याला हवी तशी साथ मिळाली नाही. कर्णधार श्रेयस अय्यर केवळ 5 धावा करून माघारी परतला, तर मार्कस स्टॉइनिसने 28 आणि सूर्यांश शेडगेने 25 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी कोनोलीला साथ दिली असती, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पंजाबची फलंदाजी यंदाच्या सामन्यात कोलमडलेली पाहायला मिळाली, ज्याचा फटका त्यांना सलग तिसऱ्या पराभवाच्या रूपाने बसला.
A win that takes the team to the ??? ?? ??? ????? ? A comfortable 33-run victory at home that takes @Sunrisers to not just 2️⃣ more points but the first spot on the points table ?? SCORECARD ▶️ https://t.co/8L0gAuxW78#TATAIPL | #KhelBindaas | #SRHvPBKS pic.twitter.com/gjgBIMUhG0 — IndianPremierLeague (@IPL) May 6, 2026
हैदराबाद ‘नंबर वन’, पंजाबची घसरण
या विजयासह सनरायझर्स हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. हैदराबादचे आता 14 गुण झाले असून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना उरलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एका विजयाची गरज आहे. दुसरीकडे, दीर्घकाळ अव्वल स्थानी असलेल्या पंजाब किंग्सची घसरगुंडी सुरू झाली आहे. फिल्डिंगमधील चुका आणि फलंदाजीतील सातत्याचा अभाव पंजाबसाठी चिंतेचा विषय ठरत असून, रिकी पाँटिंग यांच्या मार्गदर्शनाखालील या संघाला आता पुनरागमनासाठी कंबर कसावी लागणार आहे.