शिवसेना नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची चर्चा राजकारणात जोर धरत आहे. या चर्चांवर संजय रोठाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘माझ्या मंत्रिमंडळात वापसीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत. मात्र, मला संधी मिळाली तर मी नक्कीच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल’, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली आहे. तसेच मी समाजासाठी काम करतोय, यापुढेही करत राहीन, असेही राठोड म्हणाले. त्यामुळे संजय राठोड यांचे मंत्रिपदासाठी लॉबिंग? असा सवाल उपस्थित होत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड अडचणीत सापडले होते. तसेच याप्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झाल्यामुळे त्यांना मागील वर्षी वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, राठोडांच्या आरोपांबाबत चौकशी करण्याची मागणी बंजारा धर्मगुरू पुणे पोलीस आयुक्तालयात केली आहे. तसेच संजय राठोड यांना क्लीनचीट देण्याची मागणीही बंजारा समाजाने केली आहे. त्यानंतर आता राठोड पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.