एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. मात्र समीर वानखेडे यांनी मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हर्षदा रेडकर यांच्या प्रलंबित प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे.
हर्षदा रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचा आरोप मलिकांनी ट्विटरवर कागदपत्रे सादर करत केला आहे. त्यावर समीर वनखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे म्हणाले, हर्षदा रेडकर यांच्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हर्षदा रेडकर यांचे प्रकरण २००८चे आहे. या प्रकरणानंतर ९ वर्षांनी २०१७मध्ये माझे क्रांतीसोबत लग्न झाले. तसेच २००८मध्ये मी एनसीबीच्या सेवेत नव्हतो. त्यामुळे या प्रकरणासोबत माझा संबंध कसा असू शकतो? या प्रकरणात विनाकारण माझे नाव घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
समीर दाऊद वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात सहभागी आहेत का? असा प्रश्न मलिकांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. तसेच वानखेडेंना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, कारण या प्रकरणाबाबतचा खटला पुण्यातील न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच याबाबतचे कागदपत्रे त्यांनी ट्विट करत सादर केली आहेत.
क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी मलिकांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांची मेहुणी आणि क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा रेडकर यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी आरोप केला आहे. त्यामुळे क्रांती रेडकर यावर काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.