गेल्या अनेक दिवसांपासून रशिया-युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. तर युक्रेनही रशियाला जशास तसे उत्तर देत आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये रशियन सैन्याने युद्ध गुन्हे केल्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संस्थेतून रशियाचे निलंबन करण्याची मागणी अमेरिकेने केली आहे.
युक्रेनमध्ये रशियन सैन्याने युद्ध गुन्हे केल्याने सयुंक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संस्थेतून रशियाचे निलंबन करावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी केले आहे. थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी रशियाला युक्रेनची राजधानी कीव जवळील बुका शहरात नागरिकांवरील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मानवाधिकार परिषदेवरील रशियाला काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनमधील बुचा शहरामधील नरसंहाराबाबत रशियावर टीका होत असताना युक्रेनमधील बुचाच्या महापौर अनातोली फेडोरुक यांनी दावा केला की, रशियन सैन्याने शहरातील सुमारे ३२० नागरिक मारले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाचा असा दावा आहे की बुचा शहराच्या ताब्यादरम्यान रशियन सैन्यांनी नागरिकांविरोधात हिंसक कारवाई केली नाही. अमेरिका राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी मागणी केली की बुचामधील हत्या अमानवीय आहे. पुतिन यांच्यावर युद्ध गुन्ह्यांचा खटला चालवला जावा. मात्र, युक्रेननने केलेला दावा रशियाने फेटाळून लावला आहे.
रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरू आहे. तर युक्रेनही रशियाला प्रत्युत्तर देत आहे. बुधवारी पहाटे रोमानियाची राजधानी बुखारेस्टमधील रशियन दूतावासाच्या प्रवेशद्वारावर कार आदळली. कारच्या धडकेनंतर कारने पेट घेतला. या आगीत चालकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा अपघात होता की हल्ला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.