राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशन पार पडले. या ओबीसी अधिवेशनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी समाजाची उपेक्षा थांबवण्यासाठी आरक्षण गरजेचे असल्याचे सांगितले आहे. तसेच थेट मोदी सरकारला जातीनिहाय जनगणना केल्याने सत्य समोर येईल, असे आवाहन केले आहे.
समाजात ओबीसी हा सर्वात मोठा वर्ग आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे. ओबीसी समाज सन्मानाने उभा राहत नाही तोवर ओबीसींना आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे ओबीसी समाजाची उपेक्षा थांबवण्यासाठी आरक्षण गरजेचे असल्याचे शरद पवार म्हणाले.
केंद्राने जातनिहाय जनगणना करावी, सत्य काय आहे ते समोर येईल. मात्र, ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहे त्या भाजपकडून हा निर्णय होईल असे वाटत नसल्याचे शरद पवार म्हणाले. त्यामुळे आपल्याला एकत्र यावं लागेल, तसेच वेळेप्रसंगी रस्तावर उतरावे लागेल, असेही पवार म्हणाले.
न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत जो डेटा गोळा करायला सांगितला आहे, ते काम सुरू असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी शरद पवारांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक, माजी मुख्यमंत्री सांगतात की, मविआने ओबीसींना धोका दिला. त्यामुळे पाच वर्ष राज्यात सत्ता असताना, देशात सरकार असताना तुम्ही झोपला होता का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.