पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात पाय भिजल्याने फंगल इन्फेक्शन आणि दुर्गंधीचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात पायाची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून बाहेरून आल्यावर पाय कोमट पाणी व अँटीबॅक्टेरिया साबणाने लगेच धुवावे. तसेच बोटांच्या मधील भाग कोरड्या टॉवेलने पुसून अँटीफंगल पावडर वापरावी. सुती किंवा शोषक मोजे वापरावेत. तसेच ओले शूज-मोजे लगेच बदलून टाकावे. पावसाळ्यात पायांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही गोष्टी केल्यास तुमचे पाय कोमल आणि मुलायम राहण्यास मदत होईल.
पायांची काळजी घेण्यासाठी हे करा –
पाय कोरडे ठेवणे : पाय जास्त वेळ ओले राहिल्यास 'अॅथलीट फूट' (Athlete's foot) सारखे बुरशीजन्य आजार होऊ शकतात. आंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यावर बोटांच्या फटींमध्ये लक्ष देऊन टॉवेलने पाय पुसा.
पावसातील योग्य पादत्राणे : उघड्या चपलांपेक्षा जे शूज किंवा चपला पाण्याला सहज प्रतिकार करू शकतात, त्यांचा वापर करा.
मोज्यांची निवड : जाड सुती मोजे पाणी शोषून घेतात. त्यामुळे शोषक व पातळ मोजे किंवा रबरी पादत्राणे वापरणे सोयीचे पडते. नखांची स्वच्छता: नखांमध्ये घाण साचून राहिल्याने संसर्ग वाढू शकतो. नखे नेहमी छोटी व व्यवस्थित कापून ठेवावी.
पायांना वाफ/कोमट पाणी : जर पाय अस्वच्छ किंवा गटाराच्या पाण्यात गेले असतील, तर घरी आल्यावर काही वेळ पाय कडुलिंबाच्या किंवा मिठाच्या कोमट पाण्यात बुडवून ठेवावे.
मॉइश्चरायझरचा वापर : पाय कोरडे पडत असतील किंवा भेगा पडत असतील, तर झोपण्यापूर्वी फूट क्रीम किंवा मॉइश्चरायझर नक्की लावावे.