पुणे, ९ जून २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील एका आयएएस अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. हा अधिकारी महसुल विभागात कार्यरत आहे. तब्बल आठ लाख रुपयांची लाच स्विकारतानाच सीबीआयने धाड टाकत त्याच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे पुण्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका आयएएस अधिकाऱ्यावर अशी कारवाई सीबीआयने केल्याने शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
अनिल रामोड असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव असून ते अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. एका जमीनीच्या व्यवहारात ते आठ लाख रुपयांची लाच स्विकारताना सीबीआयने धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्याच नेतृत्वाखाली ही कारवाई होत असल्याची माहिती देखील समोर येत आहेत. एखाद्या आयएएस अधिकाऱ्याव सीबीआयने धाड टाकल्यामुळे पुण्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जोरदार चर्चा रंगली आहे. या छाप्यामुळे आणखी कोणते घोटाळे समोर येतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.