पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत झालेल्या गोंधळाप्रकरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याप्रकरणी माहिती घेऊन या घटनेवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची खात्री करण्यासाठी कठोर पावले उचचली जाण्याची आशाही नायडू यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंतप्रधानांचा वाहनताफा आंदोलनकर्त्यांनी रोखल्यामुळे पंतप्रधानांना १५ ते २० मिनिटे वाटेतच थांबावे लागले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत अक्षम्य चूक झाल्यामुळे पंतप्रधानांची सभा रद्द करण्यात आली. याप्रकरणी सर्वस्तरावरून पंजाब मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.