उन्हाळ्याचे दिवस अनेक आरोग्यविषयक समस्या घेऊन येतात. तीव्र उन्ह, गरम वारे आणि शरीरातील पाण्याची कमतरता याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशाच समस्यांपैकी एक म्हणजे अचानक नाकातून रक्त येणे, ज्याला वैद्यकीय भाषेत एपिस्टॅक्सिस असे म्हटले जाते. ही समस्या विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.
डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात नाकाच्या आतील भागातील ओलावा कमी होतो. त्यामुळे नाकातील आतील त्वचा कोरडी आणि कमकुवत बनते. परिणामी, अगदी किरकोळ कारणांमुळेही रक्तस्राव सुरू होऊ शकतो. गरम आणि कोरड्या हवेमुळे ही समस्या अधिक वाढते.
नाकाच्या आतली त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्यात सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात, ज्या कोरडेपणामुळे सहज फुटू शकतात. जोरात शिंकणे, नाक साफ करणे किंवा खाजवल्यास या रक्तवाहिन्या फुटून रक्त येऊ शकते. याशिवाय ॲलर्जी, सायनसचा त्रास, संसर्ग किंवा दुखापत यामुळेही नाकातून रक्त येण्याची समस्या उद्भवू शकते. काही वेळा उच्च रक्तदाब किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधांमुळेही ही समस्या वाढू शकते.
अचानक नाकातून रक्त येऊ लागल्यास घाबरून न जाता योग्य प्राथमिक उपचार करणे महत्त्वाचे असते. सर्वप्रथम सरळ बसावे आणि डोके थोडे पुढे झुकवावे. त्यामुळे रक्त घशात न जाता बाहेर पडते. त्यानंतर नाकाचा मऊ भाग अंगठा आणि बोटांनी काही मिनिटे दाबून ठेवावा. या दरम्यान तोंडाने श्वास घ्यावा. कपाळावर किंवा नाकावर थंड पाण्याची पट्टी किंवा बर्फ ठेवल्यास रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते.
वारंवार नाकातून रक्त येत असल्यास काही सोप्या घरगुती उपायांनी ही समस्या नियंत्रणात ठेवता येते. नाकाच्या आत हलके नारळ तेल किंवा पेट्रोलियम जेली लावल्याने ओलावा टिकून राहतो. उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. घरात आर्द्रता टिकवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर करणेही उपयुक्त ठरते. तसेच वाफ घेणे नाकातील कोरडेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
एकूणच, योग्य काळजी आणि साध्या उपायांनी नाकातून रक्त येण्याची समस्या टाळता येऊ शकते. मात्र, ही समस्या वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)