ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मलिकांवर ही कारवाई केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात आंदोलन केले.
मुंबईतील भाजप प्रदेश मुख्यालयासमोर राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रसरकारविराधोत घोषणाबाजी केली. या आंदोलनात विद्या चव्हाण, राखी जाधव यांच्यासह इतर राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
आयएनएस विक्रांत निधीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सोमय्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमय्या कुठे गेले? असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली पैसे गोळा करणाऱ्या सोमय्यांवर अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
उस्मानाबादेत सोमय्या यांच्या विरोधात चित्रफलक लावण्यात आले आहेत. फरार मोस्ट वॉन्टेड म्हणून सोमय्यांविरोधात पोस्टर बाजी करण्यात आली आहे. तसेच सोमय्यांना शोधणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. विक्रांत निधी घोटाळ्यातील फरार आरोपी म्हणून मोस्ट वॉन्टेड फरार आरोपी भाजपा खासदार किरीट सोमय्या असा उल्लेख या पोस्टवर करण्यात आला आहे.