मुंबई: मुंबईतील घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उंदराने चावा घेतलेल्या रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. श्रीनिवास येल्लप्पा असे या मृत रुग्णाचे नाव आहे.
कुर्ला कमानी येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी श्रीनिवास यांना मेंदूज्वर आणि यकृताचा आजार होता. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्रीनिवास यांच्या डोळ्याच्या भागात जखमा आढळून आल्याने मंगळवारी नातेवाईकांनी चौकशी केली असता, उंदराने चावा घेतल्याचे स्पष्ट झाले.
श्रीनिवास हे बेशुद्धावस्थेत होते. बुधवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच त्यांची प्रकृती गंभीर होती. याची कल्पना त्यांच्या नातेवाईकांना दिली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा उंदीर चावण्याच्या घटनेशी संबंध नाही, असे राजावाडीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.
प्रशासनाच्या बेपर्वाईविरोधात भाजपची टीका
‘सामान्य माणसाचा जीव शिवसेनेने टांगणीला लावलाय. सायन रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारी रूग्णांवर उपचार केले जातात. तर राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उंदीर रुग्णांचे डोळे करतडत आहेत. ही मुंबई आणि महापालिकेची आजची स्थिती आहे. ८० हजार कोटीचं फिक्स डीपॉझिट, १ हजार २०० कोटीच्यावर आरोग्याचं बजेट, मग या बजेटला कोण कुरतडत आहे?’, असा सवाल विचारतानाच हे पाप शिवसेनेचं असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
सायन रुग्णालयात मृतदेहा शेजारी मुंबईकरांना उपचार घ्यावे लागतात
आणि
राजावाडीत आयसीयूमध्ये रुग्णांचे डोळे उंदीर कुरतडतात
मग 80 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेचे 1 हजार 206 कोटींचे आरोग्याचे बजेट कोण खाते?कोण तिजोरी कुरतडतेय? अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे! — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 23, 2021
तसेच, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीसुद्धा या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. ‘राजावाडी महापालिका रुग्णालयात आयसीयुत दाखल असलेल्या रुग्णाचे उंदराने डोळे कुरतडण्याचा धक्कादायक प्रकार काल घडला, आज त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला! हा प्रशासकीय हलगर्जीपणा आहे, या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?’, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.
राजावाडी महापालिका रुग्णालयात आयसीयुत दाखल असलेल्या रुग्णाचे उंदराने डोळे कुरतडण्याचा धक्कादायक प्रकार काल घडला, आज त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यु झाला!@mybmc हा प्रशासकीय हलगर्जीपणा आहे, या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?मृत झालेल्या युवकाच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतो! — Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 23, 2021