मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असून, आता मनसेने राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट असे म्हणण्यास सुरूवात केली आहे. घाटकोपरमध्ये आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनसे कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे मोठे बॅनर्स घाटकोपर परिसरात लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात आला आहे.
मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर येथे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन यांना हिंदुहृदयसम्राट असे म्हटले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असून राज ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा हिंदुहृदयसम्राट उल्लेख करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख मराठी हिंदुहृदयसम्राट असा केला जात होता, त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडसावले होते, त्यामुळे आता बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात आल्यामुळे राज ठाकरे यावर काय बोलणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.