वेअरेबल टेक्नॉलॉजीच्या जगात आता आणखी एक नवा आणि आकर्षक पर्याय दाखल झाला आहे. स्मार्टवॉच, फिटनेस बँड आणि स्मार्ट रिंगनंतर आता ‘स्मार्ट इयररिंग्ज’ची चर्चा रंगू लागली आहे. ‘Lumia 2’ नावाचे जगातील पहिले स्मार्ट इयररिंग्ज बाजारात सादर करण्यात आले असून, हे गॅझेट फॅशनसोबत आरोग्य तपासणीची सुविधाही देत आहे. विशेष म्हणजे, हे इयररिंग्ज साध्या दागिन्यांसारखे दिसतात. त्यामुळे ते घातल्यानंतर कोणालाही हे फिटनेस ट्रॅकर आहे, याचा सहज अंदाज येत नाही. हलक्या वजनाचे आणि स्टायलिश डिझाइनमुळे विशेषतः तरुण वर्ग आणि महिलांमध्ये याबाबत उत्सुकता वाढली आहे.
मनगटापेक्षा अधिक अचूक डेटा
कंपनीच्या माहितीनुसार, हे स्मार्ट इयररिंग्ज कानामागील भागातून शरीराचा डेटा ट्रॅक करतात. त्या भागातील रक्तवाहिन्या त्वचेच्या जवळ असल्याने हृदयगती, तापमान आणि इतर आरोग्यविषयक माहिती अधिक अचूक मिळू शकते. हाताच्या हालचालींमुळे डेटा बिघडण्याची शक्यता कमी असल्याने हे उपकरण स्मार्टवॉचपेक्षा वेगळे ठरते.
20 पेक्षा जास्त हेल्थ फीचर्स
‘Lumia 2’ मध्ये अनेक आरोग्य मेट्रिक्स ट्रॅक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात झोपेची गुणवत्ता, हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजन पातळी (SpO2), शरीराचे तापमान, दैनंदिन हालचाली, रिकव्हरी स्टेटस यांचा समावेश आहे. महिलांसाठी खास बाब म्हणजे, हे डिव्हाइस मासिक पाळीचं सायकल ट्रॅक करण्यातही मदत करू शकतं. त्यामुळे आरोग्याबाबत सजग असणाऱ्यांसाठी हे गॅझेट उपयोगी मानलं जात आहे.
बॅटरी बदलण्याची भन्नाट सुविधा
या स्मार्ट इयररिंग्जचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे युजर्स स्वतः बॅटरी बदलू शकतात. इतर वेअरेबल डिव्हाइसप्रमाणे ते चार्जिंगसाठी काढून ठेवण्याची गरज नाही. बॅटरी संपल्यास नवीन चार्ज बॅटरी बसवता येते. कंपनीचा दावा आहे की एक बॅटरी जवळपास 7 दिवस टिकू शकते.
ब्लूटूथद्वारे मोबाईलशी कनेक्ट
इयररिंग्जमधील सर्व माहिती मोबाईल अॅपमध्ये ब्लूटूथद्वारे ट्रान्सफर होते. अॅपमध्ये युजर्सला आरोग्य रिपोर्ट, ग्राफ्स आणि वैयक्तिक सूचना मिळू शकतात.
डिझाइन आणि किंमत
हे डिव्हाइस गोल्ड, सिल्व्हर आणि टायटॅनियम फिनिशमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. कान छिद्र नसलेल्यांसाठीही विशेष प्रकार उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, याची सुरुवातीची किंमत 249 डॉलर म्हणजे अंदाजे 23,500 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय मासिक सदस्यता शुल्कही लागू शकते. डिलिव्हरी डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.फॅशन आणि हेल्थ टेक्नॉलॉजीचा संगम असलेले हे स्मार्ट इयररिंग्ज आगामी काळात वेअरेबल मार्केटमध्ये मोठी क्रांती घडवू शकतात.