भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत रश्मी ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायतीला दिलेले पत्र समोर आणले आहे तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, रश्मी टाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायतीला पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये रश्मी ठाकरे यांनी ३० एप्रिल २०१४मध्ये अन्वय नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचे म्हटले आहे. तसेच जमीन खरेदी करताना त्यावर बंगले नव्हते, असे रश्मी ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ५ कोटींची मालमत्ता असल्याचे दाखवून बनावट माहिती कोणी दिली? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यामार्फत संजय राऊत शिव्या देत असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे. घोटाळे बाहेर काढतो म्हणून संजय राऊत शिवीगाळ करतात. तसेच संजय राऊत ज्या पद्धतीने आई बहिणीवरून शिव्या देत आहेत, त्यामुळे माझे कुटुंब व्यथित होत आहे, असेही सोमय्या म्हणाले.
माझ्या विरोधात काही सापडत नाही आहे म्हणून, हे जुन्या प्रकरणांमध्ये मला अडकवत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच सचिन वाझे शिवसेनेचा प्रवक्ता असेही ते म्हणाले. संजय राऊत चाणक्य आहेत. त्यांनी वाधवा यांचा उल्लेख केला. पवार आणि वाधवा यांचे संबंध काय आहे, जनतेला माहित आहे. तसेच मला सुप्रिया ताईंवर आरोप करायचे नाहीत, असेही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केल आहे.