किडनी स्टोनची समस्या आजकाल मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली, कमी पाणी पिण्याची सवय, जास्त फास्टफूड आणि अनियमित आहार यामुळे अनेकांना या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. स्टोनची वेदना सुरू झाली की अनेकजण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय शोधतात. त्यामध्ये सर्वाधिक ऐकायला मिळणारा सल्ला म्हणजे “बिअर प्या, स्टोन बाहेर पडेल.” पण खरंच बिअरमुळे किडनी स्टोन बाहेर पडतो का? याबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
तज्ज्ञांच्या मते, बिअरमध्ये Diuretic गुणधर्म असतात. म्हणजेच बिअर प्यायल्यावर लघवीचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे अनेकांना वाटतं की किडनीतील स्टोनही लघवीद्वारे बाहेर पडेल. मात्र डॉक्टर सांगतात की हे पूर्णपणे सुरक्षित किंवा खात्रीशीर उपचार नाहीत. उलट काही वेळा हा उपाय धोकादायक ठरू शकतो.
किडनी स्टोनचा आकार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. साधारणपणे 5 मिलिमीटरपेक्षा लहान स्टोन काही वेळा नैसर्गिकरीत्या बाहेर पडू शकतात. मात्र मोठा स्टोन असल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. किडनीपासून मूत्राशयापर्यंत जाणारी नळी खूप अरुंद असते. त्यामुळे मोठा स्टोन त्या मार्गात अडकला तर असह्य वेदना, लघवीत अडथळा आणि संसर्ग यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
काही संशोधनांमध्ये मर्यादित प्रमाणात बिअर घेतल्यास भविष्यात स्टोन होण्याचा धोका कमी होऊ शकतो, असे नमूद करण्यात आले आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की आधीपासून असलेला स्टोन बिअरमुळे बाहेर पडेल. डॉक्टरांच्या मते अनेक लोक सोशल मीडियावरील माहिती किंवा इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून बिअरचा “उपचार” म्हणून वापर करतात, हीच सर्वात मोठी चूक आहे.
विशेष म्हणजे बिअरमध्ये Oxalates नावाचे घटक असतात. हे घटक अनेक प्रकारच्या किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात बिअर घेतल्यास नवीन स्टोन तयार होण्याची शक्यताही वाढू शकते. सुरुवातीला लघवी वाढली तरी शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते आणि त्याचा ताण थेट किडनीवर पडतो.
डॉक्टर सांगतात की जर स्टोनमुळे आधीच मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाला असेल, तर जास्त द्रव घेतल्याने वेदना आणखी वाढू शकतात. काही रुग्णांना मळमळ, उलट्या किंवा लघवी बंद होण्यासारख्या गंभीर समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे स्वतःहून कोणताही उपाय करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
आजकाल किडनी स्टोनसाठी अनेक सुरक्षित उपचार उपलब्ध आहेत. काही औषधं मूत्रमार्गातील स्नायूंना रिलॅक्स करून छोटे स्टोन कमी त्रासात बाहेर पडण्यास मदत करतात. तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठे स्टोनही शस्त्रक्रियेशिवाय किंवा कमी त्रासदायक पद्धतीने काढता येतात.
किडनी स्टोन टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेसं पाणी पिणं. यासोबत संतुलित आहार, कमी मीठ आणि योग्य जीवनशैली राखणं आवश्यक आहे. डॉक्टर स्पष्ट सांगतात की बिअर हा किडनी स्टोनवरील अधिकृत उपचार नाही आणि कोणताही घरगुती उपाय करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र याचा दावा करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)