दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे. भारतातील इतर धर्मियांमध्येही हा सण साजरा केला जातो. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक अशी या सणाची ओळख सांगतात. हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस असतो. दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिक निवासस्थान, कामाचे ठिकाण येथे स्वच्छता करतात, सजावट करतात, पणत्या लावल्या जातात, रोषणाई केली जाते, रांगोळी काढून परिसर सजवला जातो. दिवाळीत पहाटे उठून शरीराला तेल उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. हिंदू, जैन आणि शीख दिवाळी साजरी करतात. या निमित्ताने फराळाचे पदार्थ तयार केले जातात. ओळखीतल्यांना भेटणे, दिवाळीच्या शुभेच्छा देणे, फराळ देणे, भेटवस्तू देणे अशा स्वरुपात दिवाळी साजरी करतात. मुले फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटतात. दिवाळी हा सण भारतासह जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये दिवाळी निमित्त सुटी दिली जाते.
दिवाळी या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. रावणाचा पराभव करून राम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतला. राम परतला त्यावेळी आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येच्या नागरिकांनी त्यावेळच्या पद्धतीनुसार दिवाळी साजरी केली. विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी (विश्वकर्मा) या हिंदू देवतांशीही दिवाळीचा संबंध आहे. महावीर यांच्या अंतिम मुक्तीचे प्रतिक म्हणून जैन धर्मियांमध्ये दिवाळीला महत्त्व आहे. मुघलांच्या बंदीवासातून गुरू हरगोविंद यांची सुटका झाली म्हणून शीख दिवाळी साजरी करतात. पूर्व भारतात आणि बांगलादेशमध्ये कालीमातेची पूजा करून दिवाळी साजरी करतात. दिवाळीसाठी गोडधोड केले जाते. विविध चवीच्या मिठाया तयार केल्या जातात. या मिठाईची खरेदी आणि वाटप केले जाते.
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व…
वसुबारस : आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह अर्थात वासरासह पूजा करतात. घरातील सर्व प्राण्यांना गोडधोड खाऊ घालतात. घरातील महिला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात.
धनत्रयोदशी : आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असे सांगतात.
नरक चतुर्दशी : पहाटे उठून शरीराला तेल उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. मुले फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटतात. घर सजवतात.
लक्ष्मीपूजन : आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. अनेक घरांत श्रीसूक्तपठण करतात. व्यापाऱ्यांचे नवे वर्ष लक्ष्मीपूजनानंतर होते. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.
बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला “शुभा” असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी – बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही पद्धत आहे. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात.
भाऊबीज : कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवसाला “यमद्वितीया” असेही म्हणतात. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा मान राखतो. कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून हा सण साजरा करतात.