एसटी संपाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. संपकारी कर्मचारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पाहायला मिळाली आहे. हल्ला करायचा तर मातोश्रीवर करायचा, असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोहिते-पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा संबंध नसतानाही त्यांच्या निवासस्थानी जाणीवपूर्वक हल्ला करण्यात आला आहे. राज्याचे परिवहन खात्याची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे आहे. तसेच मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे. असे असताना, मग पवारांवर हल्ला का? हल्ला करायचा असले तर मातोश्रीवर करायचा होता, असे ते म्हणाले.