कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत नागरिकांना सतर्क केले आहे. लॉकडाऊन नको असेल तर कोरोना नियम पाळा, मास्क घाला तसेच गर्दीच्या ठिकाणा जाणे टाळा. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा २० हजारच्या पुढे गेला तर मुंबईत मिनी लॉकडाऊन किंवा पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत काळजी घेण्याचे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. तसेच ज्या इमारतीमध्ये २० टक्क्याहून जास्त कोरोना रुग्ण आढळले असता ती इमारत सील करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन ते तीन दिवसात याबाबत बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य प्रशासनाची चिंता वाढली असून राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य सरकार कोरोनाची तिसरी लाट रोखण्याच्या तयारीत आहेत. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जसे दुसऱ्या लाटेला हरवले तसेच आतासुद्धा कोरोनाला हरवू, परंतु नागरिकांनी कोरोना नियम पाळणे आवश्यक आहे तसेच नागरिकांनी लस घेणे, मास्क वापरणे बंधनकारक आहे.