राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीत पार पडलेल्या सभेत ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. त्यामुळे ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला असून अमोल मिटकरांकडून माफीची मागणी ब्राह्मण समाजाकडून जोर धरत आहे. मात्र, अमोल मिटकरी माफी मागणार नसल्याच्या वक्तव्यावर ठाम आहेत.
अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तर राजकीय वर्तुळातून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, मी कुठल्याही समाजाविरोधात बोललो नाही. तसेच माझ्या वक्तव्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असून मी माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
अमोल मिटकरी यांनी सांगलीतील सभेत ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवल्याच्या निषेधार्थ पंढरपुरमध्ये खा.सुप्रिया सुळे यांना ब्राह्मण समाजातील बांधवांनी श्री विठ्ठल मंदिरा बाहेर घेराव घालत आमदार मिटकरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार अमोल मिटकरी हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण समाज बांधवांनी पंढरपुरात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.