येत्या २२ डिसेंबरपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. मात्र या अधिवेशनावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अधिवेशन घेण्याची राज्य सरकारची मानसिकता नसल्याची बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यात घडलेल्या घोटाळा आणि भ्रष्टाचारावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळातच राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार घडला असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तसेच राज्यात वसुली सत्र सुरू असल्याचेही ते म्हणाले. राज्य सरकार नेहमी चर्चा टाळायची भूमिका घेत असून सरकारचा आमदारांवर विश्वास नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये लोकशाही नाही तर ठोकशाही आणि रोखशाही असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीला काळिमा फासणे असे ते म्हणाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही तर इंधन दर कमी न करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
राज्यात परीक्षा घोटाळ्याचे तुरण वर्गावर परिणाम होत असून, तरुणाईचा त्यांच्या व्यवस्थेवरून विश्वास उठत आहे. त्यामुळे परीक्षा घोटाळासंबंधी सीबीआय चौकशी होण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे. तसेच मागील दोन वर्षांमध्ये इम्पेरिकल डेटा का गोळा करता आला नाही? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारमुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.