सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर करतात. त्यामध्ये लिपस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण सतत लिपस्टिकचा वापर केल्यामुळे ओठांचा नैसर्गिक रंग बदलू लागतो. कालांतराने ओठांचा रंग गडद किंवा काळपट दिसू लागतो. अशातच अनेक महिला महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरू लागतात. पण काही सोप्या घरगुती उपायांमुळे ओठांचा काळेपणा कमी करण्यास आणि नैसर्गिक गुलाबी रंग मिळण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया घरगुती उपाय ज्याने नैसर्गिकरित्या ओठांचा काळपटपणा दूर होऊ शकतो.
1. मध आणि लिंबूचा वापर
मध आणि लिंबू हे दोन्ही नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहेत, जे ओठांचा काळेपणा कमी करण्यास मदत करतात. एक चमचा मधामध्ये लिंबाचे थेंब टाका आणि ओठांवर लावा. 10-15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या ओठांचा काळपट रंग कमी होण्यास मदत होते.
2. मध आणि साखरेचा स्क्रब
ओठांना वेळोवेळी स्क्रब करणे आवश्यक असते. त्यामुळे तुमच्या ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. यासाठी तुम्ही मध आणि साखरेचा स्क्रब बनवू शकता. यासाठी एक चमचा मध आणि थोडीशी साखर मिसळा आणि ते हलक्या हाताने 1-2 मिनिटे ओठांवर मसाज करा. नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि उजळ दिसू लागतात.
3. तूप किंवा तेल लावणे
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप किंवा तेल लावावे. त्यामुळे तुमचे ओठ मऊ राहतात आणि नैसर्गिक गुलाबीपणा टिकून राहतो. असे नियमितपणे केल्यास ओठांचा काळेपणा कमी होण्यास मदत होते. हे रात्रभर तसेच ठेवू शकता.
4. गुलाबजल
गुलाबजल हे ओठांची काळजी घेण्यासाठी लोकप्रिय घरगुती उपाय आहे. गुलाबजल हलक्या हाताने ओठांवर लावा. 10-15 मिनिटांनंतर धुवा किंवा तुम्ही ते तसेच ठेवू शकता. गुलाबजलमुळे ओठ हायड्रेटेड राहतात, कोरडेपणा आणि फुटलेले ओठ यांवर उपाय करतात. त्याचबरोबर नैसर्गिक रंग सुधारण्यास मदत होते.
5. बीटरूटचा वापर
बीटरूटचा रस ओठांवर लावा किंवा बीटरूटचा छोटा तुकडा घ्या आणि ओठांवर हलक्या हाताने मसाज करा. नंतर 10-15 मिनिटांनी धुवून टाका. बीटरूटमध्ये नैसर्गिक लालसर रंग असतो, नियमित वापरल्यास ओठांवरील काळेपणा कमी होण्यास मदत होते.
ओठांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासाठी नियमित काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरगुती उपायांसोबतच पुरेसे पाणी पिणे, लिपस्टिकचा अतिरेक टाळणे आणि ओठांना मॉइश्चराइज ठेवणे गरजेचे आहे. या साध्या घरगुती उपायांचा नियमित वापर केल्यास ओठांचा काळेपणा कमी होऊन ते नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी दिसू शकतात.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)