टीईटी परीक्षा पेपरफुटीत अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर आज पुन्हा धाड टाकण्यात आली आहे. आज पुन्हा त्यांच्याकडून १० लाख रुपये हस्तगत करण्यात आले. त्यामुळे तुकाराम सुपेंचे घबाड नक्की कितीचे? असा सवाल उपस्थित होत आहे.
तुकाराम सुपे यांच्यावरील दुसऱ्या धाडीत आता १० लाख रुपये सापडले आहेत. ज्या व्यक्तीकडे तुकाराम सुपे यांनी पैसे ठेवले होते, त्याच व्यक्तीने स्वत:हुन १० लाख रुपये सायबर पोलिसांकडे आणून दिले आहेत.
तसेच आत्तापर्यंत सुपे यांच्या घरातून पोलिसांनी दोन कोटी रक्कम आणि सोने हस्तगत केले आहे. तसेच सुपेंच्या घरी पोलीसांनी धाड टाकायच्या आधीच सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी सुपेंच्या घराची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्या घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोन्यांची दागिने पोलिसांना मिळाली. सुपेंच्या घरी तपासादरम्यान कोट्यवधी रक्कम मिळाल्यामुळे सुपेंनी कोट्यवधींची माया जमवली कशी? असा सवाल तपास यंत्रणांच्या समोर उपस्थित झाला आहे. तसेच आता सुपे यांच्यावरील धाडीत पोलिसांनी १० लाख रुपये हस्तगत केल्यामुळे तुकाराम सुपेंचे घबाड नक्की कितीचे ? असा सवालही उपस्थित होत आहे.