देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत केला. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक झाले असून, आजपासून काँग्रेसचे माफी मागे आंदोलन करत आहेत. दरम्यान, भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या ‘काँग्रेसचे काळे कुत्रे जरी फिरकले तर झोडून काढू’, या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, यासाठी पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस ‘माफी मांगो’ आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यामुळे नाना पोटोलेंच्या घोषणेनंतर भाजप नेते डॉ. अनिल बोंडे आक्रमक झाले आहेत. डॉ. अनिल बोंडे यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये अनिल बोंडे म्हणाले, ‘नाना पटोले म्हणातात, महाराष्ट्रात सगळ्या भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. भाजपने माफी मागावी. खरे तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची या काँग्रेसवाल्यांनीच माफी मागायला पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळात काँग्रेससह मुख्यमंत्री कोणाच्याही कामाला आले नाही. नाना पटोले फिरकले नाही. लोकांना वाऱ्यावर सोडून दिले. काँग्रेसचे काळे कुत्रे जरी भाजपच्या कार्यालयावर फिरकले तर त्याला झोडल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते राहणार नाही.’ अशी धमकी अनिल बोंडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे.