Eye Health Tips: पावसाळ्यात वाढतो ‘ड्राय आय’चा धोका! कारण जाणून घ्या आणि डोळ्यांची अशी घ्या काळजी

पावसाळ्यात आर्द्रता वाढली तरी डोळे कोरडे पडण्याच्या समस्या वाढू शकतात. वाढलेला स्क्रीन टाइम, एसीचा वापर आणि चुकीच्या सवयी यामागे कारणीभूत ठरतात. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी महत्त्वाच्या सूचना द

Eye Health Tips: पावसाळ्यात वाढतो ‘ड्राय आय’चा धोका! कारण जाणून घ्या आणि डोळ्यांची अशी घ्या काळजी

Eye Health Tips: पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा वाढतो, धूळ आणि प्रदूषण कमी होते. त्यामुळे अनेकांना वाटते की या ऋतूत डोळ्यांना आराम मिळेल. मात्र, नेत्रतज्ज्ञांच्या मते वास्तव काहीसे वेगळे आहे. पावसाळ्यात अनेकांमध्ये ड्राय आय (Dry Eye) म्हणजेच डोळे कोरडे पडण्याच्या तक्रारी वाढताना दिसतात. यामागे हवामानापेक्षा या ऋतूमध्ये बदलणारी जीवनशैली अधिक कारणीभूत ठरते.

मुसळधार पाऊस सुरू असताना अनेकजण घरातूनच काम करणे पसंत करतात. शाळा-कॉलेजांनाही काहीवेळा सुट्ट्या दिल्या जातात. परिणामी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि टॅबलेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. ऑफिसचे काम, ऑनलाइन शिक्षण किंवा वेब सिरीज पाहण्यात तासन्तास वेळ जात असल्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो.

स्क्रीनकडे दीर्घकाळ पाहताना आपण पापण्या कमी वेळा लवतो. त्यामुळे डोळ्यांवरील नैसर्गिक अश्रूंचा थर लवकर कोरडा पडतो आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवू लागतो. त्यातून डोळे लाल होणे, जळजळ, खाज येणे, धूसर दिसणे, डोळे थकणे किंवा सूज येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. लहान मुलांमध्येही वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे ही समस्या अधिक दिसून येते.

याशिवाय पावसाळ्यात घरातील खिडक्या बंद ठेवणे, एअर कंडिशनरचा जास्त वापर आणि हवेशीर वातावरणाचा अभाव यामुळेही डोळ्यांचा ओलावा कमी होऊ शकतो. काही व्यक्तींमध्ये या काळात अॅलर्जीचे प्रमाणही वाढते, ज्याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

डोळे निरोगी ठेवण्यासाठी काही साध्या सवयी उपयुक्त ठरू शकतात.

स्क्रीन वापरताना 20-20-20 नियम पाळा. दर 20 मिनिटांनी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे किमान 20 सेकंद पाहा.

सतत स्क्रीनकडे न पाहता मधूनमधून डोळ्यांना विश्रांती द्या.

वारंवार पापण्या लवण्याची सवय लावा, त्यामुळे डोळ्यांतील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.

लॅपटॉप किंवा संगणकाचा स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा थोडा खाली ठेवा.

एसी किंवा पंख्याची हवा थेट चेहऱ्यावर येणार नाही याची काळजी घ्या.

दिवसभर पुरेसे पाणी प्या, कारण शरीरातील पाण्याची कमतरता डोळ्यांवरही परिणाम करू शकते.

डोळ्यांमध्ये सतत त्रास होत असल्यास स्वतःहून औषधे न वापरता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरता येतात.

लहान सवयी, मोठा फायदा

पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी हवामान बदलण्याची गरज नसते, तर आपल्या दैनंदिन सवयी बदलण्याची आवश्यकता असते. स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि डोळ्यांची योग्य काळजी घेणे या साध्या उपायांनी डोळे अधिक निरोगी आणि आरामदायी राहू शकतात. विशेषतः मुलांचा स्क्रीन टाइम नियंत्रित ठेवणे आणि त्यांना नियमित ब्रेक घेण्याची सवय लावणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number