राज्यात मागील महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता एसटी संप फुटला की मिटला? असा सवाल उपस्थित होत आहे.
एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तर स्वत: अजर गुजर संपातून बाहेर निघाले आहेत. अजय गुजर प्रणित संघटनेकडून संपाची नोटीस मागे घेतली असून एसटी संप मिटला असल्याची घोषणा अजय गुजर यांनी केली आहे. मात्र एसटी कर्मचारी विनिलीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे २२ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत कामावर परत येण्याचे आवाहन अजय गुजर यांनी केले आहे.
अजय गुजर म्हणाले, ‘परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत आम्ही दोन-तीन वेळा चर्चा केली. त्यानंतर काल त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमची चर्चा झाली. राज्य शासनामध्ये विलिनीकरण होण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. परंतु हा निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे तसेच अनिल परब यांनी विलिनीकरणाचा अहवाल १२ आठवड्यात मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे सांगितला आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे अजय गुजर म्हणाले.