चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यातच आता दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. दक्षिण कोरियामध्ये एकाच दिवसात ४ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच या रुग्णांमध्ये ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.
दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या देशात बुधवारी ४,००,०७१ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर एकाच दिवसात झालेली ही मोठी वाढ आहे. मंगळवारी दक्षिण कोरियामध्ये २९३ कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली होती. चीननंतर दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे जगभरात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढल्यामुळे चीनमधील चांगचुनमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे.