शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिन्यात कोसळेल,असा दावा केला होता.त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर सोमवारी राऊतांच्या दाव्यावर टीका करत १५ मार्चपर्यंत सरकार पाडा,अन्यथा तुमचा वारसा नकली आहे,असे भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान,मुनगंटीवारांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात मंगळवारी सकाळी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,“शिंदे-फडणवीस सरकारमधील एक शहाणे मंत्री म्हणाले, मार्च पर्यन्त सरकार पाडून दाखवा.’अहो कान साफ करून माझं वक्तव्य ऐका,नाहीतर कानकोरणे पाठवतो’ जर न्यायालयीन प्रक्रिया झाली तर सरकार पडेल असे मी म्हणालो होतो.या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे, कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे, हे सरकार जीवंत नाही.आमची अपेक्षा होती की जानेवारी पर्यन्त निकाल लागेल पण फेब्रुवारी पर्यन्त हा निकाल लागला तर सरकार नक्कीच फेब्रुवारीत पडेल.”,असे संजय राऊत म्हणाले आहेत.
त्याच्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी ‘त्यांच्याकडे कार्यकर्ते टिकत नाही. असाही टोला लगावला आहे. त्यामुळे अशी न पटणारी विधान ते करीत आहे.मी तुम्हाला आवाहन देतो की, तुमच्याकडे ताकद असेल शक्ती असेल, तसेच तुम्ही स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा सांगणारे असाल तर १५ मार्चपर्यंत सरकार पाडा,अन्यथा तुमचा वारसा नकली आहे.चांदयापासून बांदयापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत जनता तुमचा निषेध करेल. ‘तसेच फेब्रुवारीनंतर हे सरकार टिकलं तर राज्यसभेचा राजीनामा देणार का? ज्या लेखणीने तुम्ही सामना पेपरमध्ये लिहिता. त्याच लेखणीने एक वाक्याचा राजीनामा तुम्ही देणार का?’,अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती.