शिवजयंती उत्सवाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
तसेच आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे सावट असल्यामुळे राज्यातील सण-उत्सव साजरी करण्यासाठी निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे यंदाची शिवजयंती साजरी करण्यासाठी निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी नागरिक करत होते. त्यामुळे नागिरकांच्या मागणीचा विचार करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवजयंती उत्सवाबाबत नवी नियमावली जारी केली आहे.
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकाच दिवशी साजरी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. तर अंबादास दानवे यांच्या मागणीचे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी स्वागत केले आहे.