डोळ्यांतून सतत पाणी येणे ही समस्या अनेकांना जाणवते. सकाळी उठल्यानंतर डोळे चिकटल्यासारखे वाटणे, डोळ्यातून पाणी किंवा चिकट स्त्राव येणे, डोळे उघडताना त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते आणि अनेक वेळा वय वाढल्यानंतर ती आपोआप कमी होते.
डोळ्यांतून पाणी येण्यामागे ॲलर्जी हे एक मोठे कारण असू शकते. धूळ, धूर, परफ्यूम, फुले, गवत, प्रदूषण, काही औषधे किंवा पाळीव प्राणी यांमुळे ॲलर्जी होऊ शकते. अशावेळी डोळ्यांत खाज येणे, लालसरपणा आणि पाणी येणे सुरू होते. अशा गोष्टींपासून दूर राहणे महत्त्वाचे असते.
बदलत्या हवामानात डोळ्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. डोळे लाल होणे, पाणी येणे, जळजळ होणे आणि चिकट स्त्राव येणे ही कंजंक्टिव्हायटिसची प्रमुख लक्षणे आहेत. डोळ्यांतून अचानक जास्त पाणी येऊ लागल्यास हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.
डोळ्यांतून अश्रू बाहेर जाण्याचा मार्ग ब्लॉक होणे हेही आणखी एक कारण असू शकते. लहान मुलांमध्ये जन्मत: अश्रूंची नळी व्यवस्थित उघडी नसल्याने डोळ्यातून सतत पाणी येते. अनेक वेळा ही समस्या वयानुसार आपोआप बरी होते. मात्र काही प्रकरणांमध्ये उपचारांची गरज भासू शकते.
डोळ्यांतून पाणी येत असल्यास स्वतःहून घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याचे शिंतोडे मारल्याने थोडा आराम मिळू शकतो. संसर्ग असल्यास कोमट पाण्याने हलका शेक दिला जाऊ शकतो. लहान मुलांमध्ये डॉक्टर विशिष्ट प्रकारची मसाज पद्धत आणि औषधे सुचवतात. अश्रूंची नळी ब्लॉक असल्यास काही वेळा डीसीआर शस्त्रक्रियेची गरज लागू शकते.
डोळ्यांतून पाणी येण्यासोबतच सकाळी डोळे चिकटणे, डोळ्यांत दुखणे, चिकट स्त्राव येणे, डोळे एकमेकांना चिकटणे आणि जळजळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे वारंवार जाणवत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(Health Disclaimer : येथील आरोग्यविषयक माहिती ही केवळ सामान्य माहिती आणि जागरूकतेसाठी दिलेली आहे. या माहितीतून होणाऱ्या कोणत्याही परिणामासाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल जबाबदार राहणार नाही.)