भाजपकडून १० जूनला होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी २२ उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये आतापर्यंत एकही मुस्लीम चेहरा देण्यात आलेला नाही. राज्यसभेत भाजपकडून ३ मुस्लीम खासदार पाठवण्यात आले होते. मुख्तार अब्बास नक्वी, सय्यद जफर इस्लाम आणि एम. जे. अकबर यांचा त्यामध्ये समावेश होता. या तिघांचा कार्यकाळ पुढील महिन्याच्या सुरूवातील समाप्त होत आहे. या तिन्ही उमेदवारांना भाजपने पुन्हा संधी दिलेली नाही. त्यामुळे राज्यसभेत भाजपकडून कोणीही मुस्लीम चेहरा नसेल. राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून अजून ७ जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे या कोट्यातून भाजप मुस्लीम चेहऱ्याला संधी देणार का ? याची चर्चा रंगली आहे.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी मंत्री एमजे अकबर आणि सय्यद जफर इस्लाम. यापैकी अकबर यांचा कार्यकाळ २९ जून २०२२ रोजी संपत आहे, तर नक्वी यांचा कार्यकाळ ७ जुलै आणि सय्यद जफर इस्लामचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. जफर इस्लाम हे दोन वर्षांपूर्वी यूपीतून पोटनिवडणुकीत निवडून आले होते. एमजे अकबर मध्य प्रदेशातून आणि मुख्तार अब्बास नक्वी झारखंडमधून राज्यसभेत पोहोचले.
एनडीएमध्ये केवळ एक मुस्लीम खासदार आहे. खगडियामधून मेहबूब अली कैसर लोजपकडून निवडून आले आहेत. राज्यसभेच्या १५ राज्यांमधील एकूण ५७ जागांसाठी १० जुनला मतदान होणार आहे. या सर्व जागांचा कालावधी जुन ते ऑगस्टमध्ये कार्यकाळ संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेससह अन्य पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे.