भीमाशंकर ज्योतिर्लिंग

आपल्या हिंदू कालगणनेमध्ये श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे. व्रतवैकल्यांचा, सणवाराचा महिना म्हणून हा श्रावण ओळखला जातो. निसर्गात सुरू असलेला ऊन – पावसाचा खेळ जसा मनाला आल्हाददायक वाटतो, अगदी तसेच या महिन्यातील सण मनाला नवीन उमेद देतात. श्रावणात प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असते. यात सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा मानला […]

भीमाशंकर ज्योतिर्लिंग

आपल्या हिंदू कालगणनेमध्ये श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे. व्रतवैकल्यांचा, सणवाराचा महिना म्हणून हा श्रावण ओळखला जातो. निसर्गात सुरू असलेला ऊन – पावसाचा खेळ जसा मनाला आल्हाददायक वाटतो, अगदी तसेच या महिन्यातील सण मनाला नवीन उमेद देतात.

श्रावणात प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व असते. यात सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यंदा निज श्रावणी सोमवार आणि नागपंचमी दोन्ही एकाच दिवशी आल्याने धार्मिकदृष्ट्या मोठा सुंदर योग जुळून आला आहे. श्रावणात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला हे मोठे सणही येतात.

या श्रावणाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांची माहिती देणार आहोत.

देशभरात १२ ज्योतिर्लिंगे आहेत. शिवभक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. यातील पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. नाशिकचे त्र्यंबकेश्वर, पुण्यातील भीमाशंकर, औरंगाबाद येथील घृष्णेश्वर, बीड येथील परळी – वैद्यनाथ आणि हिंगोली येथील औंढ्या नागनाथ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नदी असलेली भीमा नदी या ज्योतिर्लिंगामधून उगम पावते. मात्र, त्यानंतर ती तेथून लुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. अतिशय घनदाट अरण्यात वसलेले हे ज्योतिर्लिंग आहे. १९८४ मध्ये या अरण्याला अभयारण्याचा दर्जा मिळाला. अतिशय घनदाट जंगल आणि तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

सुरेख बांधकाम

हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. या मंदिरात सुरेख नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावतारातील अनेक सुंदर आणि रेखीव मूर्ती येथे कोरल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज भीमाशंकराच्या दर्शनास येत असत तसंच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

भीमाशंकर देवस्थानच्या आसपास इतरही प्रेक्षणीय स्थळे आहेत.

गुप्त भीमाशंकर : भीमा नदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, मात्र, तेथून ती गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

कोकण कडा : भीमाशंकर मंदिराजवळ पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम दृश्य दिसते.

नागफणी : सीतारामबाबा आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.

कसे पोहोचाल ?

रेल्वे : भीमाशंकर देवस्थानला जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आहे. पुण्यापासून भीमाशंकर १२५ किलोमीटर अंतरावर आहे.

बस : पुण्याहून भीमाशंकरसाठी दर अर्ध्या तासानंतर नियमितपणे बस मिळते तसेच खासगी टॅक्सी, कार देखील उपलब्ध असतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number