कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत ‘विकेण्ड कर्फ्यू’ची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही संचारबंदी लावत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.
संचारबंदीच्या काळात सभागृह, मॉल, व्यायामशाळा आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच बाहेर जेवण्यावर बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. संचारबंदीमध्ये लग्न समारंभात जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी यावेळी दिली.
‘हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत’, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी लोकांना न घाबरण्याचं आवाहन करताना संचारबंदी काळात सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असं सांगितलं.