मुस्लीम आरक्षणाची मागणी करत एमआयएमची रॅली मुंबईत दाखल झाली आहे. मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र मुंबईत सभा घेण्याच्या भूमिकेवर एमआयएम ठाम असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत चांदीवलीत सभा पार पडली. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘अखेर मी मुंबईत आलोच. ही फक्त सुरूवात आहे. आंदोलन तर बाकी आहे. रॅलीदरम्यान पोलिसांना आम्हाला अडवले होते. मला अडविण्यासाठी पोलिसांवर दबाव देत आहे. तर निवडणुकांपुरतीच जनतेची आठवण येते. मुंबईत एमआयएमचे चार आमदार हवेत. आता तर शिवसेनेलाही मुसलमान नागरिकांना पुळका आला असल्याचे’ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. ‘आपण मराठ्यांकडून काही शिकणार की नाही?’ असा सवाल इम्तियाज जलील यांनी मुसलमान नागरिकांना उपस्थित केला आहे. तसेच गेल्या आठ महिन्यात वक्फ घोटाळ्याचे नऊ एफआयआर दाखल केले असल्याचेही ते म्हणाले.
एमआयएमच्या सभेदरम्यान वारिस पठाण यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री गर्वाने सांगतो की, त्यांन बाबरी पाडली’ असा टोला वारिस पठाण यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचे नाही. परंतु आम्हाला ५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. तसेच आरक्षण आमच्या हक्काचे असल्याचे आणि वक्फच्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घातल्याचे ते म्हणाले.