राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी दुपारपर्यंतची मुदत आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेनेनी तिसरा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली मात्र भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे मविआच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळाल्या. शिवसेनेचे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यातील लढतीमुळे आता राज्यसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे.
राज्यसभेची निवडणूक १० जून रोजी होणार आहे. गेल्या २० वर्षांची परंपरा आहे की, राज्यसभा-विधान परिषदेत जर निवडणुका झाल्या तर क्रॉस वोटिंग होतं आणि प्रचंड गोंधळ होतो. परंतू ज्यावेळी बिनविरोध होते त्यावेळी वस्तूस्थितीच्या आधारे होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की, राज्यसभेच्या भाजपला तीन जागा मिळाव्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत काही विचार करता येईल.
एकाच पक्षाचे २४ अधिक सहयोगींचे ६ अशी मते आमच्याकडे अतिरिक्त आहेत. विजयासाठी ४१ मतांचा कोटा आहे. आम्हाला फक्त ११ ते १२ मते कमी पडत आहेत. आघाडीच्या मतांचा आकडा ३०च्या पुढे जात नाही. आम्ही तिसरी जागा लढणं आणि जिंकणं यावर ठाम आहोत. आज खूप चांगली चर्चा झाली पण आम्हाला आमच्या पक्षाची काळजी आहे. पार्टीचा उमेदवार मागे घेणं हे शक्य नाही. आम्ही आमच्या श्रेष्ठीच्या कानावर घातले आहे ते म्हणाले तुमची भूमिका योग्य आहे. त्यांनी जर त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही तर आम्ही लढू. जर त्यांनी आता सहकार्य केलं तर आम्ही विधान परिषदेत करू असे देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.