निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहून चालत नाही तर आपल्या दैनंदिन सवयीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. विशेषतः सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाचा परिणाम होतो. जर तुम्ही दिवसाची सुरुवात काही चांगल्या सवयींनी केली तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारण्यास मदत होऊ शकते. जाणून घेऊया अशाच काही सकाळच्या सवयींबद्दल.
1. उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी प्या
रात्री अनेक तास झोपल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर एक ते दोन ग्लास पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीर हायड्रेट राहते, पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
2. हलका व्यायाम किंवा योगा करा
सकाळी 20 ते 30 मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग, योगासने किंवा हलका व्यायाम केल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते. स्नायूंना ताकद मिळते, तणाव कमी होतो आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. नियमित व्यायामामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.
3. पौष्टिक नाश्ता करा
पौष्टिक नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. सकाळचा नाश्ता टाळल्यास थकवा जाणवू शकतो आणि नंतर जास्त भूक लागण्याची शक्यता असते. नाश्त्यात प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करा. उदा: ओट्स, अंडी, फळे, दही, सुका मेवा किंवा संपूर्ण धान्यापासून बनवलेले पदार्थ खाणे फायदेशीर ठरते.
4. सकाळच्या कोवळ्या उन्हाचा लाभ घ्या
सकाळी 10 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाशात वेळ घालवल्याने शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होते. झोपेची गुणवत्ता सुधारते आणि मनही प्रसन्न राहते.
5. मोबाईलऐवजी स्वतःसाठी काही मिनिटे द्या
अनेक जणांना सकाळी उठल्या उठल्या मोबाईल बघण्याची सवय असते. पण दिवसाची सुरुवात सोशल मीडियाने करण्याऐवजी 5 ते 10 मिनिटे ध्यान, प्राणायाम, दीर्घ श्वसन करण्यासाठी द्या. यामुळे मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक विचार करण्यास मदत होते.