जयपूर, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून मॅक्रॉन यांनी भारत सरकारने आमंत्रित केले आहे. नियोजीत कार्यक्रमानुसार पॅरिस येथून विशेष विमानाने उड्डाम केल्यानंतर मॅक्रॉन थेट जयपूर विमानतळावर उतरले. जयपूरच्या विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉन यांचे गळाभेटीने स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांनी आमेर किल्ला, जयपूरचे जंतरमंतर आणि हवा महल या ठिकाणांना भेट दिली. भारतीय कारागीर, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली. चर्चेनंतर दोन्ही नेते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीयांसोबत फ्रान्सच्या सैन्याचे पथक संचलनात सहभागी होणार आहे. दिल्लीत राष्ट्रपती मुर्मू मॅक्रॉन यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन करणार आहेत.