मुंबई, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री तनुजाला जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये अर्थात अती दक्षता विभागात दाखल केले आहे. वैद्यकीय पथकाचे तनुजाच्या तब्येतीवर लक्ष आहे. तनुजावर उपचार सुरू आहेत. तब्येतीत सुधारणा होत असेल तर संध्याकाळी किंवा मंगळवारी तनुजाला घरी पाठवले जाईल, असे संकेत वैद्यकीय पथकाने दिले आहेत.
तनुजाने सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. छबिली आणि मेमदीदी या दोन चित्रपटांमुळे बालपणीच तनुजा लोकप्रिय कलाकार झाली. ‘एक बार मुस्करा दो’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने तनुजाची ओळख शोमू मुखर्जी यांच्याशी झाली. पुढे १९७३ मध्ये तनुजा आणि शोमू यांनी विवाह केला. या दांपत्याला काजोल आणि तनिषा या दोन मुली झाल्या. यापैकी काजोलने हिंदीत केलेले अनेक चित्रपट गाजले. काजोलने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत लग्न केले.