शासकीय कर्मचाऱ्यांनी ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ हे दाखवून देण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी सकारात्मक शब्द काढून टाकून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे.
पुढे सतेज पाटील म्हणाले,’आता पेटवलेला वणवा थांबवून चालणार नाही, आहे तशी जुनी पेन्शन मिळाली, तरच माघार, असे पाटील म्हणाले. जुन्या पेन्शन योजने संदर्भात चार राज्यांनी निर्णय घेतला आहे, तर मग महाराष्ट्र राज्याने घ्यावा. या मातीने संघर्ष केला तो महाराष्ट्राने पाहिला. येथील संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. एकसंधपणा ठेवा, दुधाच्या भांड्यात मीठ टाकण्याची संधी कोणालाही देऊ नका. आम्ही १०० टक्के तुमच्या पाठिशी आहोत. कितीही किंमत मोजायला लागू दे भोगायला तयार आहोत, असे पाटील म्हणाले.
“या मोर्चामध्ये ३५ शिक्षक संघटना आणि ५० मध्यवर्ती संघटना सहभागी झाल्या होत्या. सरकारी कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा आहे. जुन्या पेन्शनचा मुद्दा १५ वर्षापासून फक्त चर्चेतच आहे. प्रत्येकवेळी आर्थिक कारणच सांगितले जाते. नव्या पेन्शनच्या भूमिकेवरुन अन्याय होत आहे. देशात सात टक्के महागाई असताना परतावा मात्र २ टक्केच दिला जातो. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी उणिवा भोगल्या आहे, अशा शब्दांत पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली.