उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात शिवसेनेच्या मालकीवरून सुरु असलेल्या वादाचा फैसला आता लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्यासोबत फुटून बाहेर निघाले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ आणि संसदेत आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत संपूर्ण शिवसेना पक्षावरच आपला दावा सांगितला होता. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार असल्याचे समजत आहे. निवडणूक आयोगाचा कौल काय असणार, यावर उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागू शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरेंचे भवितव्य अस्थिर होऊ शकते.
प्रत्यक्षात तसे घडल्यास उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत येऊ शकतात. गेल्या काही दिवसांत भाजपसोबत एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्येक कायदेशीर पाऊल काळजीपूर्वक टाकले जात आहे. आता निवडणूक आयोगापुढे एकनाथ शिंदे आपली बाजू कशी मांडतात, हे पाहावे लागेल. तर उद्धव ठाकरे शिवसेना आपल्याकडे ठेवण्यासाठी काय करणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.