प्रत्येक वर्ष काही तरी देणारं आणि घेणारं असतं. त्याचप्रमाणे आठवणी भरलेल्या असतात. २०२० आणि २०२१ हे याच नाही, येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आठवणीत राहणार आहे. त्याचे कारण “कोरोना” जागतिक महामारी आहे. या कोरोनाने अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर काहींचे कोलमडून पडले आहेत. कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे आई-वडील गेले, कोणाला मुलांना तर कोणाला भाऊ -बहीण, साथीदाराला ( नवरा, बायको, मित्र-मैत्रीण) गमवावे लागले. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण कोरोनासोबत जगायला शिकलो आहेत. हे शिकत असताना २०२१मध्ये मराठवाड्याने काय कमावले आणि काय गमावले हे पाहणे गरजेचे आहे. सरकारी, राजकीय, सामाजिक, नैसर्गिकदृष्टया या सगळ्या बाबींचा विचार केल्यास २०२१मध्ये मराठवाड्याने कमावलं का गमावलं हे स्पष्ट होईल.
मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर आणि राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. जगाच्या पाठीवर पर्यटननगरी आणि ऑटोमोबाईल हब अशी दुहेरी ओळख औरंगाबादची आहे. मात्र या दोन्ही क्षेत्रात २०२१मध्ये औरंगाबादच्या पदरात काहीच पडले नाही. ठाकरे सरकारकडून औरंगाबादकरांना खूप अपेक्षा होत्या आणि आहेत. मात्र वर्षभरात पूर्ण निराशा पदरी पडली आहे. औरंगाबादवर विशेष प्रेम असणाऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. औरंगाबाद हे राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख जाते. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे पर्यावरण व पर्यटन मंत्री असताना देखील औरंगाबादच्या पदरात काहीच पडले नाही. त्याच उद्योगमंत्री सुभाष देसाई हे औरंगाबादचे पालकमंत्री आहे. औरंगाबादला पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसी आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई कॉरिडॉर या ठिकाणाहून जात असताना औरंगाबादला गेल्या वर्षभरात एकही मोठा उद्योग आला नाही. यातून उद्योगांमध्येही औरंगाबादची निराशाच झाल्याचं स्पष्ट होतं. औरंगाबादला जे हक्काचे मिळणार होतं ते केंद्रीय क्रीडा विद्यापीठ देखील पुण्याला हलवल्याने शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातली मोठी हानी औरंगाबादची झाली आहे. कोरोना काळात औरंगाबादने ३ हजार ६५० जण गमावले आहेत. प्रामुख्याने औरंगाबादकरांनी क्रीडा विद्यापीठ आणि ३ हजार ६५० आपल्या जवळच्या लोकांना गमावले.
ज्याप्रमाणे औरंगाबादकरांनी २०२१ खूप काही गमावले त्याच प्रमाणे काही कमावले देखील आहे. त्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच म्हणजे स्वातंत्र्याच्या ७५मध्ये औरंगाबादला प्रथम केंद्रात भागवत कराड यांच्या रुपाने केंद्रीय मंत्री पद मिळाले आहे. औरंगाबाद-पुणे या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून नव्या वर्षात या मार्गाने नागरिकांना प्रवास करता येणार आहे. नेहमीच दुष्काळ असणाऱ्या मराठवाड्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने धरण शंभर टक्के भरली आहेत. २० वर्षापासून रखडलेली औरंगाबादची पाणी पुरवठा योजना यंदा प्रत्यक्षात कार्यान्वित होताना दिसत आहे. मराठवाड्याच्या ८ जिल्ह्याचा विचार केल्यास सर्वाधिक काही कमावलं ते औरंगाबादकरांनी आणि गमावलं तेही औरंगाबादने.
औरंगाबादच्या शेजारी जालना आणि बीड जिल्ह्याचा २०२१ आढावा घेतला तर त्यामध्ये जालना जिल्ह्याला विभागीय मनोरुग्णालय, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) मिळाले आहे. त्याचबरोबर केंद्रात रेल्वे मंत्रीपद आणि त्यामुळेच मनमाड ते परभणीचा रेल्वेचा मार्गाचा दुहेरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीड ने मात्र काही कमावले नाही आणि काहीच गमावले नाही अशी बीडची प्रगती गेल्या वर्षभरातली आहे. हिंगोलीचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्याचे राजकीयदृष्ट्या खूप मोठं नुकसान झाले काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते राजीव सातवं यांचं अकाली निधन हे एक खूप मोठं नुकसान आहे. हिंगोली प्रमाणे नांदेडमध्ये ही राजकीयदृष्ट्या आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने काँग्रेस मोठं नुकसान झाले आहे. नांदेडपर्यंत समृद्धी महामार्ग नेण्याचा निर्णय झाल्याने ही नांदेडसाठी एक मोठी अचिव्हमेंट आहे.
उस्मानाबादने विशेष काही कमावले आणि गमावले नाही मात्र ज्याचा जिल्ह्यातील राजकारणावर मोठा परिणाम होता आणि शेतकऱ्यांना फायदा होता असा तेरणा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू झाला आहे. ज्यांच्या ताब्यात तेरणा कारखाना त्याच्या हातात जिल्ह्याच्या राजकारण अशी या कारखान्याची ओळख आहे. लातूरची मात्र २०२१ मध्ये शून्य प्रगती आहे.
२०२१मध्ये सगळ्यात मोठी हानी झाली ती आपले जवळचे कोणी तरी गमावलाची. प्रत्येकाने आपला कोणी तरी नातेवाईक, जवळचा मित्र, शेजारी गमावला आहे. प्रत्येक जण या सर्व वेदना पचवत पुढे जात आहे. २०२१ जे काही गमावले ते पुन्हा २०२२मध्ये गमावण्याची वेळ येऊ नये या अपेक्षासह पुढे जाऊया आणि नव्या वर्षाचे स्वागत नव्या उमेदीने करूया. ‘हॅप्पी न्यू यर २०२२’
– अशोक कारके, औरंगाबाद
( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )