मुंबई, ८ मे २०२३, प्रतिनिधी : मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचालींचे निमित्त झाले आणि मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला. मात्र, या हिंसाचाराची बिजे गेल्या काही वर्षांपासून पेरली गेली.
मणिपूरमध्ये ३४ अनुसूचित जमाती आहेत. त्यातील बहुतांश नागा आणि कुकी समुदायांतील आहेत. राज्यात बहुसंख्येने म्हणजे सुमारे ६४ टक्के लोकसंख्या असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा हवा आहे. ही मागणी तशी जुनीच. पण, उच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मैतेईंच्या मागणीबाबत चार आठवड्यांत उचित निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने १९ एप्रिल रोजी राज्य सरकारला दिले होते. त्यावर कार्यवाही होण्याआधीच ‘ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर’ या संघटनेने बुधवारी मोर्चा काढला. त्यास हिंसक वळण लागले. आणि मणिपूर मध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला आहे…
दरम्यान, मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मणिपूरमध्ये अडकलेल्या मुलांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पेशल विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. आणि त्या सोबतच तेथे असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद देखील साधला. घाबरलेल्या मुलांना धीर देत त्यांना काळजी करू नका, असेही सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि विद्यार्थ्याना धीर दिला…