मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून आज (रविवार) रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घोषित केला आहे. हा मेगाब्लॉक पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसल्यास येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहीम या स्थानावर अप, डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. काही गाड्या रद्द करण्यात येतील.
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि पनवेल या स्थानकावर मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते वाशी आणि नेरुळ अप, डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत ब्लॉक, सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन मार्गावर, तर सकाळी 10.45 ते दुपारी 3.38 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर आणि वाशी ते ठाणे अप मार्गावर ब्लॉक असणार आहे.
ब्लॉकदरम्यान ठाणे ते वाशी, बेलापूर, नेरुळ, पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.